एखादी घटना, एखादा अनुभव किंवा एखादी साहित्यनिर्मिती मला आवडली की दुसर्या कुणाला तरी त्याबद्दल सांगून, त्याविषयी लिहून, इतरांना त्या आंनदात सामील करुन घ्यावे ह्याची माझ्या मनाला ओढ लागते. मग ती घटना कुठल्याही क्षेत्रातली असो नाही तर विषयातली असो. एखादे चांगले पुस्तक वाचले, चांगली कविता वाचली किंवा चांगल्या गाण्याची मैफिल जमून गेलेली पाहिली की, तिच्याविषयी बोलायचा किंवा लिहायचा मला अनावर मोह होतो. ‘चार शब्द’ ह्या संग्रहातील या प्रस्तावनादेखील माझ्या स्वभावातल्या ह्या अनावर मोहापोटीच निर्माण झालेल्या आहेत. गेली पन्नासएक वर्षे कलानिर्मितीच्या निरनिराळ्या क्षेत्रांत मला वावरायला मिळाले. ह्या काळात मी लिहिलेल्या या प्रस्तावना आहेत. मात्र ह्या प्रस्तावना म्हणजे एखाद्याच्या लेखनातले गुणदोष दाखवणारे चिकित्सक समीक्षण नाही. मला आवडलेल्या पुस्तकांचे आस्वादकाच्या भूमिकेतून केलेले हे स्वागत आहे. मीच एका ठिकाणी प्रस्तावनांना ‘स्वागतपर गद्य’ असे म्हटलेले आहे. ह्यामागे, स्वत:च्या लेखनाने ज्यांनी आपल्याला आनंद दिला, त्या लेखकांविषयीची कृतज्ञतेची भावना आहे. सुंदर कलाकृती वाचकाचे, श्रोत्याचे किंवा प्रेक्षकाचे जीवन अधिक सुंदर करून जाते. माझ्या सुदैवाने, अचानक धनलाभ व्हावा तशी ही पुस्तके मला वाचायला मिळाली. ह्या प्रस्तावना लिहिण्याचा मुख्य हेतू, निरनिराळ्या पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष जावे हाच आहे.
~ पु.ल.देशपांडे
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|