निसर्ग नियमानुसार जग चालत असते. पूर्वी देव हा जगाचा नियंता आहे, अशी श्रद्धा होती. संतसाहित्य, तत्वज्ञान
यामुळे ही संकल्पना दृढ होती; पण जसजसा विज्ञानाचा विकास होत गेला, तसे मानव, प्राणिशास्त्र, व अवघी जीवसृष्टी,
निसर्ग यांच्यातील घडामोडींमागे शास्त्रीय कारण असल्याचे स्पष्ट होत गेले. उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे अनेक गुढ गोष्टींची उकल होऊ लागली.
जनुके, डीएनए याबाबत समजून घेण्याची गरज आता सर्वांनाच आहे. आपण कसे आहोत, आपण का आहोत,आपल्याभोवतालचे जग कसे आहे.
या प्रश्नांची उत्तरे डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांच्या 'गोफ जन्मांतरीचे' मधून मिळतात.उत्क्रांतीच्या नजरेतून त्यांनी घेतलेला
माणसाच्या आयुष्याचा वेध उत्कंठावर्धक आहे. माणसाला आकाशातील चंद्र-ताऱ्यांचे कुतूहल फार पूर्वीपासून आहे,
पण ज्या शक्तीने या विश्वाला जन्म दिला त्याचेच आपणही घटक आहोत. माणूस अशीच एक जगावेगळी निर्मिती आहे,
त्यामुळे त्याला मी कोण आहे, हा प्रश्न तुलनेने थोडा उशिरा पडला असला तरी आता त्याबाबतही आपल्याला बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे.
माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. उत्क्रांती या विषयावर मराठीत फार थोडी पुस्तके असली तरीही हा विषय
आता नवीन राहिलेला नाही; पण रोजच्या संशोधनागणिक त्यात आणखी काही हरवलेले दुवे सापडत आहेत.
त्यामुळे उत्क्रांतीवर जेवढी चर्चा करावी तेवढी अपुरीच राहणार आहे. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’ हे पुस्तक मानवी
उत्क्रांतीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून वेध घेणारे आहे. त्यात उत्क्रांती व जनुकशास्त्र यांच्यातील अन्योन्य संबंध उलगडला आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|