गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या ‘छेलेबेला’ ह्या आत्मकथनाचं ‘पोरवय’ हे मराठी भाषांतर आहे. वयाची ऐंशी वर्षं उलटून गेल्यावर ह्या कथनातून त्यांनी आपलं पोरवय उभं केलं आहे. पोरवयातल्या डोळ्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं, त्याची ही संस्मरणं आहेत. त्या काळी त्यांचा ज्यांच्याशी संबंध आला, लोभ जडला, त्या आप्तस्वकीयांची, गुरुजनांची, सेवकांची, जोराशांको येथील त्यांच्या भव्य वास्तूची, तिथल्या पुष्करिणीची, वृक्षलतांची, गच्चीत संध्याकाळी जमणार्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफिलींची रवीन्द्रांनी हळुवार शब्दांनी रेखाटलेली ही स्मृतिचित्रं आहेत. मराठी वाचकाला पोरवयातील रवीन्द्रांचं दर्शन घडावं ह्या हेतूनं मी हे भाषांतर केलं आहे. हे करताना बंगाली भाषा, साहित्य, संस्कृतीशी एकरूप झालेल्या श्री. अशोक शहाणे ह्यांनी या कामात मला खूप मदत केली. भाषांतर शक्य तितक निर्दोष व्हावं यासाठी त्यांनी कटाक्ष बाळगून मला सतत मार्गदर्शन केलं.
हे भाषांतर करीत असताना बंगाली भाषेतील बारकावे समजून घेणं हा एक आनंददायक अनुभव होता. "प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवीचा असे" असं केशवसुत म्हणून गेले. ते जपणं किती हृदयस्पर्शी असतं याचं ‘पोरवय’ हे एक सुंदर उदाहरण आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|