अलाहिदा -- वेगळा; पृथक; विभक्त; अलग असे अर्थ आणि या प्रत्येक अर्थाच्या अवतीभवती गुंफलेले अपरिमित आशयांचे असंख्य धागे..............केवळ शाईनंच नाही, तर प्रसंगी अश्रूंनी, रक्तानं, घामानं; फक्त कागदावरच नाही तर स्वतःच्या आणि रसिकांच्या काळजावर, नुसत्या लिहिलेल्या नाहीत तर कोरलेल्या कविता. रोजच्या जगण्यातले विषय, प्रसंग, संघर्ष, तडजोडी, भेदाभेद, यांच्याशी निगडित असंख्य निरागस प्रश्न आणि त्यांच्या उत्तरादाखल 'मला काय त्याचे?' अशी निगरगट्ट मानसिकता यांचं विलक्षण द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या रचना. काही मुक्त कविता, काही सशक्त गझल, काही व्यक्त, बरंचसं अव्यक्त........हिमनगाचं सागराच्या पातळीवर दृष्टीस पडणारं टोक म्हणजे अलाहिदा. अजून सागराच्या पोटातली त्याची व्याप्ती किती आहे, हे कल्पनेतच!
काही दु:खे त्रास होती, दुष्काळी वादळे खास होती
त्याला समुद्रच हवा होता, त्याने शब्द खारे घेतले
हे असं नेमकेपण व्यक्त करणारा तनवीर कविता लिहायला घेतो आणि सुरुवात करतो ती
चार बाय आठच्या खोलीत
स्वतःचं वैयक्तिक आभाळ अंथरून
त्यावरची हलकीशी ताऱ्यांची जळमट बाजूला सारून
शिसपेन्सिलीने चंद्र दळायला ........
त्याची ही अपूर्ण कविता वाचताना त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी की त्याच्या शब्दकळेचा 'गुलजार' दरवळ मनात भरून घ्यावा की त्याच्या मुक्तछंदासारख्या उड्या मारत रस्ताभर पसरलेल्या अपूर्ण कवितेच्या पूर्णत्वाचं कौतुक करावं हे न कळल्यानं पुन्हा पुन्हा कविता वाचत राहणं आणि तिच्यात गुंतत राहणं हेच हाती उरतं. त्याच्या कवितांमधले असंख्य निरागस, हळवे पण अनुत्तरित प्रश्न नक्कीच अस्वस्थ करतात आणि
'तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मैं' या गुलजारजींच्या शब्दांची सतत आठवण करून देत रहातात.
तनवीरची कविता उंच आहे, खोल आहे, खरी आहे, थेट आतून आलेली आहे. तिच्यात कसलीही कृत्रिमता नाही, सजावट नाही, आरास नाही. साच्यातून काढलेली मूर्ती जशी आकर्षक वाटते, तसंच अनुभवी, कुशल कारागिरानं साच्याशिवाय हातानं बनवलेलं शिल्पही मन मोहून घेतं. तशीच ही कविता मुक्त असो की लयबद्ध, दोन्ही रूपांत शोभून दिसते. मुक्तछंदात मुक्तपणे विहरणारा तनवीर तितक्याच ताकदीने उत्तम गझलही लिहितो. वृत्तातही त्याची सहजप्रवृत्ती प्रवाही आणि प्रभावीपणे व्यक्त होताना दिसते.
आभाळ तेच ठेवू, परक्या हवेत बोलू
हद्दीत फक्त राहू, आपापलेच बोलू
यासारखे थेट पोहोचणारे आणि वाचता वाचता आशयाचे असंख्य पदर उलगडत नेणारे शेर याची साक्ष देतात.
तनवीरच्या कवितेतला हळवेपणा, तरलता फुलांच्या स्पर्शासारखी कोमल तर तिची बोच जराशी काटेरी, मर्मज्ञ रसिकाच्या काळजावर कळत नकळत चरे पाडणारी. विद्रोहाची स्फोटक विधानं नाहीत, दु:खाचं अतिरेकी उदात्तीकरण नाही, अन्यायाचं अविवेकी अवडंबर नाही, सामाजिकतेचा अनावश्यक डांगोरा नाही, तरीही ही कविता अस्वस्थ करते, केवळ अस्वस्थच नाही तर अंतर्मुखही करते. खऱ्या अर्थानं आजच्या काळाची कविता आहे ही, माणुसकीच्या अकाली मृत्यूचं दु:ख सोसणारी तरीही हताश न होणारी. मुळातून वाचावी, वाचत रहावी, जाणून घ्यावी, मनात भिनवून घ्यावी.
तनवीरच्या कवितेतली सत्यता, तळमळ, कळकळ वाळवंटात रोपटे लावण्याचा प्रयत्न करतेय आणि हे जाणून तो
निवडुंग बनू नकोस
तुला वाळवंट जपायचं नाहीये
तुला तुझे रोपटे तगवायचे आहे
ही प्रेरणा आपल्या कवितेला देतो.
तनवीर, तुला या कवितेचं रोपटं नुसतं तगवायचं नाहीय, त्याला जिवापाड जपायचं आहे, वाढवायचं आहे. त्याचा महान वृक्ष होऊन वास्तवाच्या वाळवंटात आस्थेची, सत्याची, सत्वाची, माणुसकीची, आपुलकीची सावली देत राहो, हीच मन:पूर्वक शुभेच्छा!
क्रांति
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|