अनेक वर्षांपूर्वी मी शॉचे पिग्मॅलियन हे नाटक वाचले आणि वाचता वाचता त्यातली पात्रे मला आपली मराठी वाटायला लागली. स्वभाषेचा आग्रह, दुराग्रह, भाषेच्या उच्चारपद्धतीवरून ठरणार्या उच्चनीचत्वाच्या कल्पना जगभरच्या मनुष्यसमाजात रूढ आहेत. बोलण्याची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांतले हेलकावे, लकबी, ह्यांतून आढळून येणारी जातीय, प्रान्तीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्ये टिपत राहणे हा माझा आवडीचा छंद आहे. अर्थात तो मराठीपुरता मर्यादित आहे. ह्या माझ्या छंदाला वाव देणारे पिग्मॅलियन वाचत असतानाच त्यातल्या पात्रांच्या संवादांची मराठी रूपडी मला दिसायला लागली. हे नाटक मराठीत आणावे असे मधून मधून वाटत राहिले आणि हा विचार त्या त्या वेळी कुठे कुठे मी बोलूनही दाखवला. त्यानंतर काही वर्षांनी सतीश दुभाषी माझ्याकडे नवीन नाटकाची मागणी घेऊन आला, तेव्हा माझ्या मनात हा पिग्मॅलियन पुन्हा जागा झाला. सतीशसारखा गुणी नट मला प्रो. हिगिन्सच्या भूमिकेत दिसायला लागला आणि मग मात्र मी ‘ती फुलराणी’ हे नाटक लिहून काढलं. मुख्यत: सतीशसाठी. मंजुळेच्या भूमिकेसाठी भक्ती बर्वेला आणि विसूभाऊसाठी अरविंद देशपांडेला घेण्याचा आग्रह धरला तो सुनीताने. इंडियन नॅशनल थिएटरने हे नाटक रंगमंचावर आणले. सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, अरविंद देशपांडे, राजा नाईक, मंगला पर्वते ह्या गुणी कलावंतांना बरोबर घेऊन ह्या नाटकाचे दिग्दर्शन करणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव होता. ह्या नाटकाच्या स्वभावाला धरून त्यातल्या शब्दाशब्दाला, वाक्यावाक्याला खेळवीत ह्या प्रयोगातल्या कलावंतांनी नाटकात रंग भरला.
~ पु. ल. देशपांडे
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|