जर्मन नाटककार ब्रेश्टच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ ह्या नाटकावरून मी हा ‘तीन पैशाचा तमाशा’ रचला आहे. ब्रेश्टच्या नाटकांचे रचनेच्या दृष्टीने मराठी तमाशाशी जवळचे नाते आहे.
ब्रेश्टने रंगभूमीला लोकशिक्षणाचे साधन मानले. नाटकी रम्यवादातून मुक्त केले; पण मनोरंजनाशी नाते तोडले नाही. संगीत, नृत्य, विनोद अशा नाटकाच्या रंजकतेत भर घालणार्या घटकांचे वैचारिक गांभीर्याच्या नावाखाली उच्चाटन केले नाही.
नाटककार, दिग्दर्शक, कवी, संगीतज्ञ आणि तत्त्वचिंतक ब्रेश्ट हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाला होता. उपाशीपोटी नीती, संस्कृती वगैरे परवडत नाहीत हे त्याला पक्के उमजले होते. मार्क्स म्हटले की, काही लोकांच्या मनात उगीचच किल्मिषे निर्माण होतात. त्यांना लगेच प्रचारकी साहित्य, बोधवाद वगैरेची आठवण होते. ललित साहित्यातून बोध झालाच पाहिजे आणि बोध होताच कामा नये अशा दोन टोकांच्या भूमिकांवरून वाद चालू असतात. कमकुवत प्रतिभेच्या लेखकाच्या कृतीतल्या बोध आणि कला दोन्ही कमकुवत प्रतिभेचा माणूसच शिक्षण आणि रंजन यांतला समतोल राखू शकतो.
जीवनात कला जो आनंद किंवा उल्हास निर्माण करतात त्याला ब्रेश्टने कधीही गौण मानले नाही. नाटकाला त्याने ‘खेळ’च मानले. "No matter how fearful the problems they handle, plays should always be playful. " हे त्याचे उद्गार ध्यानात घेण्यासारखे आहेत. आणि असा हा खेळकरपणा त्याच्या सर्व नाट्यकृतींतून दिसतो. ब्रेश्ट कवी होता. नाजुकतेचे व सुंदरतेचे त्यालाही आकर्षण होते. पण त्याला ‘मेजाशी खेचून लेखनाला प्रवृत्त करीत होती’ ती मात्र माणसांच्या दुनियेत सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी चालणारी अमानुषता. त्यातून निर्माण होणार्या दु:खाविषयीची सहानुभूती ही त्याची मूळ प्रवृत्ती. ‘थ्री पेनी ऑपेरा’ ही त्याच्या ह्या मूळ प्रवृत्तीतून उभी राहिलेली नाट्यकृती आहे. समाजातल्या उपेक्षित आणि काही प्रमाणात अभागी अशा जीवांची कथा त्याने आपल्या खास नाट्यशैलीला अनुसरून हसवीत, गाणी गात, भेदक थट्टा करीत सांगितली आहे.
Contact Us |
Others |
My Account |
Help |
Payment Options
|